महारेरा क्यूआर कोड

MAHA-RERA QR CodeMAHA-RERA QR CodeMAHA-RERA QR Code

महारेरा क्यूआर कोड आणि घरखरेदीतील पारदर्शकता

घरखरेदी ही बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. तरीही, आकर्षक जाहिराती, झगमगती होर्डिंग्स आणि गुळगुळीत आश्वासनांच्या आड अनेकदा आवश्यक माहिती दुर्लक्षित राहते. याच पार्श्वभूमीवर महारेराने (महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण) लागू केलेली क्यूआर कोड प्रणाली ही केवळ तांत्रिक सुविधा नसून, ग्राहक संरक्षणाची एक महत्त्वाची प्रशासकीय पायरी ठरते. योग्य वापर केल्यास ही प्रणाली घरखरेदीतील जोखीम लक्षणीयरीत्या कमी करू शकते.

रेरानुसार प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाच्या जाहिरातींवर, फलकांवर आणि प्रमोटरच्या परिसरात क्यूआर कोड आणि रेरा नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक आहे. याशिवाय, रेरा संकेतस्थळावरील प्रकल्प नोंदणी प्रमाणपत्राच्या खालीही तोच क्यूआर कोड उपलब्ध असतो. या क्यूआर कोडचे वैशिष्ट्य असे की, कुठेही स्कॅन केला तरी तो एकाच अधिकृत माहितीकडे घेऊन जातो. त्यामुळे माहितीची विश्वासार्हता ही जाहिरातदाराच्या शब्दांवर नाही, तर थेट नियामक व्यवस्थेवर आधारित असते.

क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उघडणाऱ्या पानावर प्रकल्पाचे नाव, प्रमोटरचे नाव, प्रकल्पाची सद्यस्थिती (सक्रिय की निष्क्रिय), प्रकल्पाचा प्रकार आणि संपूर्ण नोंदणी प्रमाणपत्राचा पीडीएफ उपलब्ध असतो. मात्र, या प्राथमिक माहितेपेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे प्रकल्पाच्या कालमर्यादेशी संबंधित तपशील. प्रकल्प कधी नोंदणीकृत झाला, मूळ पूर्णता तारीख कोणती होती आणि त्यानंतर किती वेळा मुदतवाढ घेण्यात आली, हे सर्व स्पष्टपणे दिसते. विशेष परिस्थितींमध्ये दिलेल्या एक वर्षापर्यंतच्या सवलती आणि ५१ टक्के ग्राहकांच्या संमतीवर आधारित वाढीव मुदती यामधील फरकही येथे सहज लक्षात येतो. या माहितीतून प्रकल्पाच्या वेळापत्रकातील शिस्त किंवा शिथिलता ग्राहकाला लगेच समजू शकते.

कमेंसमेंट सर्टिफिकेट (सीसी) संदर्भातील माहिती हा क्यूआर कोडचा आणखी एक निर्णायक भाग आहे. अनेक प्रकल्पांमध्ये संपूर्ण लेआउट मंजूर असले तरी सीसी काही मर्यादित मजल्यांपर्यंतच मिळालेला असतो. क्यूआर कोडमधील माहितीवरून सीसी कोणत्या मजल्यापर्यंत आहे आणि त्या मजल्यांपर्यंत किती सदनिका उपलब्ध आहेत, हे स्पष्ट होते. यामुळे ग्राहकाला कोणत्या टप्प्यापर्यंत तुलनेने सुरक्षितपणे बुकिंग करता येईल याचा वास्तववादी अंदाज बांधता येतो. सीसीच्या पुढील टप्प्यांवर बुकिंग करणे कायदेशीर असले तरी त्यातील जोखीम ग्राहकाच्या जबाबदारीवर असल्याचेही अप्रत्यक्षपणे अधोरेखित होते.

आर्थिक शिस्त तपासण्यासाठी क्यूआर कोडमधील ‘फॉर्म फाईव्ह’ ही माहिती विशेष महत्त्वाची ठरते. या वार्षिक अहवालात प्रमोटरने ग्राहकांकडून किती रक्कम गोळा केली, त्यातील किती रक्कम प्रकल्पासाठी काढली आणि एकूण जमा व खर्चाची स्थिती काय आहे, हे नमूद केलेले असते. यामुळे प्रकल्पातील निधीचा वापर योग्य दिशेने होत आहे की नाही, याचा अंदाज येतो. कामाच्या प्रगतीची टक्केवारीही येथे दर्शवली जाते, ज्यावरून कालावधी आणि प्रत्यक्ष प्रगती यातील तफावत सहज लक्षात येऊ शकते.

क्यूआर कोडची उपयुक्तता केवळ नोंदणी आणि आर्थिक तपशीलापुरती मर्यादित नाही. प्रकल्पाविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारी, त्यांवरील आदेश, नॉन-कम्प्लायन्स अर्ज आणि आवश्यक ठिकाणी काढलेले वॉरंट्स यांची माहितीही येथे उपलब्ध असते. यामुळे प्रमोटरची नियामक आदेशांप्रती असलेली भूमिका आणि प्रकल्पातील वादांची तीव्रता ग्राहक स्वतः तपासू शकतो. ही माहिती लपवली जाऊ नये, हा या व्यवस्थेचा मूलभूत उद्देश आहे.

थोडक्यात, क्यूआर कोड ही केवळ एक तांत्रिक चौकट नाही, तर घरखरेदीत माहितीवर आधारित निर्णय घेण्यासाठीचे प्रभावी साधन आहे. आकर्षक जाहिरातींच्या शब्दांपेक्षा त्या जाहिरातीच्या कोपऱ्यातील छोटा क्यूआर कोड अधिक बोलका ठरतो. घरखरेदी करताना त्या कोडला स्कॅन करून काही मिनिटे दिली, तर वर्षानुवर्षांची आर्थिक अनिश्चितता टाळता येऊ शकते. पारदर्शकतेचा हा कस स्वीकारणे आणि वापरणे, हेच आजच्या घरखरेदीदाराचे खरे संरक्षण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत